उसाचे पहिले पेमेंट प्रतिटन २८५० रुपये द्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  यंदा गळीतासाठी येणाऱ्या उसाला २ हजार ८५० रुपये मेट्रीक टनाप्रमाणे पहिले पेमेंट व सत्तर तीस यानुसार अंतिम बाजारभाव मिळावा,

अशी मागणी करत साखर कारखानदारांनी येत्या १५ दिवसांत या मागणीची दखल घेऊन घोषणा करावी; अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, अशी भूमिका शेतकरी संघटनेच्या वतीने मांडण्यात आली.

सन २०२०-२१ या उसाच्या गळीत हंगामातील प्रश्नांसंदर्भात प्रादेशिक सहसंचालक (साखर आयुक्त) नगर यांच्या कार्यालयामार्फत शेतकरी संघटनेचे व साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत प्रामुख्याने उसाच्या प्रतिटन एफआरपीबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे मागील गळीत हंगामाची शेतकऱ्यांची रक्कम थकीत असताना चार साखर कारखान्यांना पुन्हा गाळप परवाना कसा दिला? असा सवाल शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठकीत केला.

कारखान्याचे वजन काटे तपासणी करणाऱ्या भरारी पथकात शेतकरी संघटनेचे प्रतिनिधीची नियुक्ती, शेतकऱ्यांना बाहेरील वजन काट्यावर वजन नोंदवण्याची परवानगी, साखर उतारा व उत्पादित झालेल्या साखर पोत्याची टॅगिंगचे काम ऑनलाइन करणे, ऊस वाढ्याची अतिरिक्त १०० रुपये प्रतिटन रक्कम शेतकऱ्यांना मिळावी,

साखर उतारा काढण्याचे सुधारित मॉडेल तयार करावे, शेतकऱ्यांना ऊस दराचा फायदा होण्यासाठी दोन साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करणे, उपपदार्थाची निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना अतिरिक्त फायदा मिळावा, या मागण्या करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24