Ahmednagar Politics : पाच वर्षांत तुम्ही गावागावांत का तळ का ठोकला नाही, राज्य व देशातील भाजप सरकारने सर्वसामान्य कुटुंबांचा आर्थिक ताळेबंद बिघडून टाकला आहे. प्रपंच करताना किती तारेवरची कसरत करावी लागते,
याची जाणीव सत्तेतील मश्गूल नेत्यांना नाही. शेतकरी महिलांना संसार करताना काय यातना सहन कराव्या लागतात, हे ग्रामीण भागात जाऊन पहा. तुम्ही कितीही गावोगावी तळ ठोका,
पण जनता तुमचा यंदा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. अशी घणाघाती टीका माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता केली.
या वेळी अधिक बोलताना ढाकणे म्हणाल्या की, स्व.बबनराव ढाकणे यांनी या तालुक्याच्या हितासाठी अनेक दूरगामी प्रकल्प व योजना प्रत्यक्षात साकारल्या. ज्यांचा लोकांना लाभ मिळत आहे.
गेल्या दहा वर्षात एकतरी ठोस काम विरोधकांकडून झाल्याचे दाखवून द्या. असा टोला आमदार राजळे यांचे नाव न घेता लगावला. तसेच फक्त निवणुकीत भावनिक साद घालून सत्तेची पदे मिळवायची नंतर जातीचे राजकारण करायचे हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.
महागाईमुळे सामान्य महिला मेटाकूटीला आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे व घामाचे मोल मिळत नाही. अशी टीका देखील त्यांनी केली.