अहमदनगर बातम्या

महावितरण प्रशासनाकडून शेतकऱ्यांचा छळ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- शेती मोटरपंप वीजबिलाची सक्तीने वसुली करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे पाप राहुरी तालुक्यात सुरू आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा हा त्रास त्वरित थांबवण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांनी दिला.

शेतीपंपाच्या विजबीलाची सक्तीची वसुली थांबवण्यात यावी, तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांची भरपाई रक्कम शासनाकडून मिळावी, या मागणीसाठी राहुरी तालका प्रहार संघटनेतर्फे सोमवारी नगर मनमाड राज्य महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावरील वाहतुक काहीकाळ ठप्प झाली होती. लांबे म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचे गेले असून शेतमालाला योग्य भाव नाही. अतिवृष्टीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची गरज असताना अद्याप भरपाई मिळालेली नाही. इंधन, बी, बियाणे, खते यांच्या वाढत्या किंमती पाहता शेती करावी कशी? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांचा हा छळ सुरू असताना शेतक-यांच्या नावावर राजकारण करणारे मौन बाळगुन असल्याची टिका सुरेश लांबे यांनी केली.

या रास्तारोको आंदोलनात कुमार डावखर, आप्पासाहेब माळवदे, शिरीष गायकवाड, विजय साळवे, नवनाथ देवरे, संतोष जगदाळे यांच्यासह विविध संघटनाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तहसिलदार फसोद्दीन शेख व पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office