अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- बालरोग तज्ज्ञ डॉ. गजानन मंकीकर यांच्या भोसरी येथील मंकीकर या लहान मुलांच्या हॉस्पिटल व सर्जिकल नर्सिंग होममध्ये एका साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.
संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या पोटातून चक्क ब्लेडचे तुकडे, स्क्रू, खिळे, लोहचुंबकाचा एक खडा, पिना, कटर, आदी घातक वस्तू निघाल्याने डॉक्टरही चक्रावून गेले. शस्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट सर्जन डॉ. आदित्य कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचे मोठे सहकार्य मिळाल्याचे डॉ. अनिल काळे यांनी सांगितले.
अंदाजे ६० वर्षांच्या ज्येष्ठास ऐन कोरोनाच्या काळात व राज्यात सगळीकडे आचारसंहिता असलेल्या कालावधीत, सगळीकडे कडक लॉकडाऊन असलेल्या काळात एक दिवस सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका वृद्धास रक्ताच्या तीन उलट्या झाल्या.
त्यामुळे त्यांना भोसरी येथील मंकीकर लहान मुलांचे हॉस्पिटल व सर्जिकल नर्सिंग होम येथे नातेवाईक घेऊन आले. त्याठिकाणी डॉ. अनिल काळे यांनी रुग्णाला तपासून पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले.
त्यानंतर त्याच्या काही तपासण्या करण्यात आल्या. प्रथमदर्शनी एक्स – रे आणि सोनोग्राफी करण्यात आली. त्यामध्ये रुग्णाच्या पोटात काही लोखंडाचे तुकडे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.
डॉ. आदित्य कुलकर्णी यांच्या सल्ल्यानुसार पुन्हा रुग्णाच्या पोटाचा सिटीस्कॅन करण्यात आला. त्यात पोटात लोखंडी अवशेष असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्कॉपी करून हे तुकडे काढण्याचा निर्णय घेतला गेला.
परंतु दुर्बिणीतून ही शस्रक्रिया करणे शक्य झाले नाही. त्यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी ओपन सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. जठर लहान व मोठे आतडे ऑपरेशन करून
पोटातील त्या लोखंडी वस्तू मोठ्या कौशल्याने बाहेर काढून रुग्णाला जीवदान दिले. डॉ. आदित्य कुलकर्णी, डॉ. मैत्रेय कुलकर्णी व डॉ. अनिल काळे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले.