अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून विदर्भासहीत अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय.
राज्यात पुढील 48 तासांत गुलाबी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात आज बुधवारी यलो अलर्ट दिला आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. नगर जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. अहमदनगर, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली, अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, नेवासा, शेवगावसह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू होता.
अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने सोयाबीन आणि कपाशी तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी कांदाही भिजला आहे.
आगास सोयबीनच्या शेंगा वाळलेल्या आहेत. अशा पिकांना दणका बसला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लहान व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात सोमवारी रात्री कहर माजवला.
गेल्या 48 तासात मुसळधार पावसामुळे मराठवाडा विभागात 10 जणांनी जीव गमावला आहे. बीड जिल्ह्यात 3, उस्मानाबाद आणि परभणीत 2, जालना,नांदेड आणि लातूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, मराठवाड्यासाठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत.
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. तर, मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.