विहिरीच्या पाण्यात अज्ञाताने टाकले विष; असंख्य मासे मृत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आजही अनेक गावपातळीवर विहिरींचा उपयोग केला जातो. विहिरीच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एका समाजकंटकाने विहिरीच्या पाण्यात विषारी पदार्थ टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यामुळे विहिरीतील असंख्य मासे मृत झाले असून विहिरीजवळील एका शेतकर्‍याच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील हनुमानवाडी परिसरातील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीतुन बिरदवडे, अभंग, कांबळे, जाधव, भोईटे, विधाटे व पटारे वस्त्यांसाठी पाणी पुरवठा केला जातो.

दरम्यान, काही शेतकरी पाणी पुरवठा विहिरीजवळ काम करत असताना त्यांना विहिरीच्या इंजिनसमोर काही बाटल्यांसह इतर साहित्य आढळून आले. संबंधित शेतकरी विहिरीत डोकावले असता, त्यांना विहिरीच्या पाण्यावर असंख्य मासे मृतावस्थेत दिसले. तसेच पाण्यावर विशिष्ट प्रकारच्या द्रवाचा तवंग आल्याचा दिसून आला.

त्या शेतकर्‍याने तात्काळ उपसरपंच राधाकिसन विधाटे यांना माहिती दिली. त्यांनी आरोग्य सेवक प्रदीप गवई यांच्या मदतीने पाण्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला.

प्राथमिक तपासणीत पाण्यात विषारी द्रव मिळाल्याचा निष्कर्ष निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने सदर विहिरीचा पाणी पुरवठा थांबविला. तसेच ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे यांनी विहिरीतील पाणी उपसा करून विहिरीच्या स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24