Ahmednagar News : पोषण आहार अंतर्गत देण्यात येणारे अंडे खाल्ल्याने अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना उलट्यांचा त्रास झाला.
हा प्रकार लक्षात येतात शाळेतील शिक्षकांनी त्यांना शेंडीचे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु मुलींची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राजूर येथे हलविण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे, अकोले तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या वारंघुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पुरक आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अंडे, केळी व राजगिरा लाडू यापैकी एका वस्तुचे विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पुरक आहार दिला जातो. वारंघुशी शाळेमध्ये बुधवारी (दि.२१) दुपारी अंडे व केळीच्या स्वरुपात पुरक आहार दिला गेला.
यातील वैशाली अनिल घाणे (वय १०), मेघना गोरख गभाले (वय १०) व पायल नवनाथ भागडे (वय १०), इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी अंड्याच्या स्वरुपात पुरक आहार घेतला. त्यानंतर काही वेळाने या मुलींना उलट्यांचा त्रास होऊ लागला.
सदर बाब तेथील शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांना गावातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सदर मुलींना पुढे हलविण्याची सूचना दिली असता, सदर विद्यार्थिनीना शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
शेंडी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करुन खबरदारीचा उपाय म्हणून राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थीनींना दाखल केले. याबाबत माहिती देताना शेंडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष शेळके म्हणाले,
वारंघुशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थीना उलट्यांचा त्रास होत असल्याने शेंडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंडे खाल्याने उलट्या होत असल्याने पुढील खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णवाहिकेद्वारे राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
राजूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिघे म्हणाले, सदर प्रकार जरी प्रथमदर्शनी पित्तामुळे उलट्या झाल्याचे दिसून येत असले, तरी अन्नातून विषबाधा असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, केंद्रप्रमुख तुकाराम एरंडे म्हणाले, राजूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी पित्तामुळे उलट्या झाल्या असल्याचा दाखला दिला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार जर खराब असेल, तर तो विद्यार्थ्यांना दिलाच का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणातील शाळा प्रशासनातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.