अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात वाळू तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच दिवसेंदिवस या वाळू तस्करांची मुजोरी देखील वाढू लागली आहे.

दरम्यान वाळू तस्करांना आळा बसावा यासाठी प्रशासन देखील सरसावले आहे.नुकतेच कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील भीमा नदी पात्रात पोलीस प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. दरम्यान गेल्या काही दिवसात वाळू तस्करांचा सूळसूळाट झाला आहे.

जिल्हा प्रशासनाने वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी घातली आहे. शिवाय अवैधरित्या वाळूची वाहतूक होऊ नये, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथकही तयार केले आहे. परंतु या आदेशाला झुगारून अनेक वाळू तस्कर नदीनाल्यातून दररोज शेकडो ब्रास वाळूची चोरी करतात.

बेकायदा वाळू उपसा करून त्याची विक्री करण्याचे प्रकार जिल्ह्यात सर्रास घडत असून हे वाळू तस्कर प्रशासन यंत्रणेलाही भीक घालीत नाहीत हा अनुभव आहे. मात्र आता या तस्करांना पोलीस प्रशासनाने चांगलाच खाक्या दाखविला आहे. कर्जत येथे अशीच एक कारवाई करण्यात आली.

येथील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केल्या आहेत. त्यानुसार राशीन दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे पथकासह सिद्धटेक फाटा येथे गेले होते. त्यावेळी जलालपूरमार्गे एक ट्रक येताना दिसला.

त्यामधून वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याला वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही.

ट्रक व अडीच ब्रास वाळू असा एकूण चार लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय शहाजी झुंजरूक (वय २६, रा. नवनाथनगर, आधोरेवाडी, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24