अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर मध्ये वाळूतस्करांनी धुडगूस घातला आहे. वाढत्या वाळू तस्करीमुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे.
नुकतेच संगमनेर तालुक्यातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत ट्रॅक्टर, ट्रॉलीमधुन वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान वाळू तस्करीप्रकरणे मोहन भीमाजी जेडगुले ( वय २०, सायखिंडी फाटा, ता. संगमनेर), शेहबाज शेख व इस्माईल पठाण (दोघेही रा. रहमतनगर, संगमनेर) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी जेडगुले याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील नदीपात्रातून वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. त्यानुसार देशमुख यांनी गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला संबंधित ठिकाणी कारवाईचे निर्देश दिले.
त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ट्रॉलीतील १ ब्रास वाळू तसेच ट्रॉली, ट्रॅक्टर असा एकूण ३ लाख १४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.