अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग यास अमानुषपणे मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी इंद्रजीत रमेश कासार यास स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले आहे.
दरम्यान आरोपी इंद्रजीत रमेश कासार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द कोतवाली, नगर तालुका, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वी वाळकी येथे विश्वजीत प्रतिष्ठानच्यावतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावेळी विरोध केल्याचा राग मनात धरुन दि.17 नोव्हेंबर रोजी विश्वजीत कासार व त्याच्या इतर साथीदारांनी ओंकार बाबासाहेब भालसिंग याला जबर मारहाण केली होती.
जखमी भालसिंग याच्यावर पुणे येथे उपचार चालू असताना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात कासार व त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपी कासार याला वाळकी येथे जावून शिताफीने ताब्यात घेतले.