अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : पोलिसांनी डोंगरात मुक्काम करत घरात पुरलेल्या दागिन्यांसह ‘असे’ पकडले आरोपी, श्रीगोंद्यातील सुद्रिकेश्वर महाराज मंदिर चोरी प्रकरणाचा छडा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात १२ फेब्रुवारीला चोरी झाली होती. चोरटयांनी २४ लाखांचे चांदीचे दागिने चोरून नेले होते. या चोरीने जिल्हाभर खळबळ उडाली होती.

पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून तिघांना अटक केली आहे. भास्कर खेमा पथवे (वय 46 वर्षे, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर), राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे (वय 30 वर्षे, रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर), भाऊराव मुरलीधर उघडे (वय 36 वर्षे, रा.विटा, ता.अकोले) असे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत. सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी झाल्यानंतर ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेशित केले होते.

दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपद्धती लक्षात घेतली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, अमृत आढाव, आकाश काळे, भाऊसाहेब काळे,

रणजित जाधव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे, देवेंद्र शेलार, उमाकांत गावडे व अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन आरोपीच्या शोधार्थ रवाना केले. सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढत असताना त्यांना हा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भास्कर खेमा पथवे याने त्याच्या साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने नांदुरी दुमाला या ठिकाणी जात आरोपीची माहिती काढली असता हा आरोपी नांदुरी दुमाला गावचे शिवारातील डोंगरावर राहत असल्याचे समजले. पोलीस पथकाने आरोपीचे राहते घराच्या आजूबाजूच्या डोंगरात पायी जाऊन 2 दिवस मुक्काम केला,

तो घरी आल्याची माहिती प्राप्त होताच त्याच्या घरास चोहोबाजूने घेरले. त्यास ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे व भाऊराव मुरलीधर उघडे यांसोबत केल्याची कबुली दिली.

गुन्ह्यातील चोरी केलेले चांदीचे दागिने हे भाऊराव उघडे याचे राहते घरामध्ये पुरुन ठेवले असल्याची माहिती देत ते दागिने काढून दिले. पोलिसांनी त्याच्या साथीदारासही ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office