अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील डॉ. डी. एस. मेहता विद्यालय परिसरातून शिक्षिकेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी सप्टेंबर महिन्यात लांबविले होते. तसेच ऑक्टोबर महिन्यातही एका विवाहितेची पोत लांबविली होती.
या दोन्ही दाखल घटनांचा तपास शहर पोलीस करत असताना यातील आरोपींना ताब्यात घेऊन १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तक्रारदारांना सुपूर्द केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.२० वाजता संगीता गणेश देशमुख (वय ५४, रा.साईनगर) या डॉ. डी. एस. मेहता विद्यालयात दुचाकी उभी करीत असताना अचानक मोटारसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी देशमुख यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळून गेले.
या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुरनं. २९३/२०२१ भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच ३ ऑक्टोबरला ८.३० वाजेच्या सुमारास पूजा किशोर ओढेकर (वय २९, काळेमळा) ह्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मॉर्निंग वॉक करुन परत येत असताना
रस्ता पार करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभ्या असताना त्यांच्या पाठीमागून विना क्रमांकाची काळ्या रंगाच्या पल्सरवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून नेली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुरनं. ३००/२०२१ भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर दोन्ही गुन्हे करण्याची पध्दत ही एकसारखी असल्याने दोन्ही गुन्हे करणारे आरोपी हे एकच असल्याच्या संशयावरुन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,
कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह पथकाने आरोपींचा कसोशीने शोध घेवून सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करुन
मंगळवारी (ता.७) संबंधित तक्रारदार यांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ठोंबरे हे करीत आहेत. या कामगिरीबद्दल पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.