Ahmednagar News : पोलीस निरीक्षक पोलीसांचा वचक व धाक निर्माण करण्यास असमर्थ ! अधिकाऱ्याचे निलंबन करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून दोन खुनासारखे गंभीर गुन्हे व ३०७ सारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. सदर घटनेमध्ये टोळी करून युवकांना टारगेट करुन मारण्यात आले आहे. तसेच काही युवकांवर चाकू, तलवार, सत्तुर, कोयता, गावठी कट्टा अशा हत्यारांनी मारहाण करुन व भिती दाखवून शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे.

या सर्व घटनांबाबत पोलीस अधीक्षक यांना वारंवार कायदेशीर कारवाई करण्याबाबत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी समक्ष भेटून तक्रारी निवेदन दिले होते. तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत लेखी व तोंडी कळविले होते.

परंतु गंभीर स्वरूपाच्या मारामारीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यात प्रभावी ठरलेले नाही. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्याचे पो. नि. मधुकर साळवे यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून केले.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही या आधी वारंवार पोलीस प्रशासनाला अहमदनगर शहरामध्ये नाकाबंदी, बिना नंबरच्या गाड्यांवर कारवाई, काळ्या काचांच्या गाड्यांवर कारवाई तसेच महाविद्यालयीन परिसरात पोलीस गस्त वाढविणे व महाविद्यालयीन युवकांकडे असलेल्या मोटारसायकलच्या डिक्क्या तपासून त्यामध्ये काही घातक शस्त्र आहे. का याची खातरजमा करण्याबाबत वारंवार विनंती केली.

मात्र आजतागायत कोणतीच उपाययोजना झाली नाही. याबाबत या अगोदर उपाययोजना केल्या असत्या तर न्यू आर्टसमधील विद्यार्थ्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला नसता. पोलीस निरीक्षक साळवे हे पोलीसांचा वचक व धाक निर्माण करण्यास असमर्थ असून त्यांच्याकडून अशा घटनांना आळा बसावा अशी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नसल्याचे म्हटले आहे.