Ahmednagar News : विचार मांडण्यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम आहे; परंतु याचा काही तरुण दुरुपयोग करीत आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदींवर आक्षेपार्ह मजकूर, तलवार घेऊन फोटो टाकतात,
तसेच जातीय तेढ निर्माण करतात. अशांवर स्थानिक पोलिसांसह सायबर पोलिसांची विशेष नजर आहे. त्यामुळे शांतता भंग होईल, असे वर्तन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. तर दुसऱ्या बाजूला रमजान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सव करून आहेत. या अनुषंगाने पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झालेली असते.
या काळात प्रशासनाचे सर्वच विभाग काळजीपूर्वक सर्वच गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. त्याचप्रमाणे पोलिसांचेही अशा आक्षेपार्ह पोस्टवर जास्तच लक्ष असते. या काळात कुणी अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली व त्याची तक्रार पोलिसांत गेली, तर पोलीस तातडीने लक्ष घालतात.
त्यामुळे विशेष तरुणांनी ही गोष्ट ध्यानात घेऊन सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहायला हवे. निवडणूक कायदे, आदर्श आचारसंहिता आणि आयोगाने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन होता कामा नये.
■निवडणूक आणि वाद
निवडणुकीच्या काळात पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. यासाठी उमेदवारांच्या नाव व चिन्हाचा प्रचार करण्यात येतो; परंतु सोशल मीडियातून एकमेंकाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सोशल मीडियावरून कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून मीडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे. उमेदवार व समर्थकांचे फेसबूक पेज, व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांची नजर राहणार आहे.
■उपद्व्यापी कार्यकर्ते
अनेक राजकीय नेत्यांकडे कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे उद्योगी कार्यकर्ते असतात. त्यातील ज्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर उमेदवाराइतकेच लक्ष पोलिस ठेवून आहेत.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या उपद्रवी समर्थकांची पोलिसांनी यादी तयार केली आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांना तत्काळ ताब्यात घेतले जाणार आहे.
■होणार कायदेशीर कारवाई
उमेदवार व त्याच्या समर्थकांनी सोशल मीडियाचा वापर उमेदवाराच्या प्रचारापुरता केला पाहिजे; परंतु धार्मिक भावना दुखविणे, वैयक्तिक टीका-टिप्पणी करणे, खालच्या पातळीवरील माहिती टाकणे, अशा गोष्टी करू नये.
कायदा व सुव्यवस्था बिघडिविणारी माहिती टाकणाऱ्याऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.