अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- वाळूच्या वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यातील (ता.राहाता) पोलीस नाईक २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे.
यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील तक्रारदाराच्या वाळूच्या वाहनावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक भाऊसाहेब संपत सानप याने ३० हजार रुपयांची २७ मे रोजी मागणी केली होती.
अखेर तडजोडीअंती २० हजार रुपये घेण्याचे ठरले. याबाबत नाशिक लाचलुचपत विभागाकडे संबंधित तक्रारदाराने तक्रार दिली होती.
त्यानंतर पंचासमक्ष लाच स्वीकारताना पोलीस नाईक सानप याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सदर कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर,
संदीप साळुंखे, हवालदार पळशीकर, नाईक प्रवीण महाजन, गरुड, चापोशी व जाधव यांच्या पथकाने केली आहे.
या धडक कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, कोविडच्या संकटात पहिल्या फळीत काम करणाऱ्या पोलीस दलाच्या प्रतिमेला बाधा पोहोचली आहे.