अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी विजय महादेव हुलगुडे (रा. जामखेड) व त्याचे साथीदार पुणे येथून दि.५ ऑक्टोबर रोजी ९७ लाख रुपयांची बॅग चोरी करून पसार झाले होते.
या चोरट्यांना कर्जत व पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ६० लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, या सराईत आरोपीचा शोध येरवडा पोलीस व गुन्हे शाखा, पुणे शहर हे घेत होते.
त्या अनुषंगाने येरवडा पोलीस आणि क्राईम युनिट ५ यांनी कर्जत पोलीस स्टेशनला या आरोपीचा शोध घेण्याबाबत कळविले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. कर्जत पोलीस तपास करत असताना सदरचे आरोपी हे विर ता. पुरंदर जि. पुणे येथे असल्याची खात्रीशीर बातमी बातमीदाराकडून मिळाली.
आरोपी कर्जत- जामखेड परिसरातील असल्याने कर्जत पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. आरोपी हे वीर येथील शाळेजवळ लपून बसलेले होते. आरोपी विजय महादेव हुलगुंडे, (वय २५ वर्ष रा. काटेवाडी ता. जामखेड) व त्यास मदत करणारा आरोपी नाना रामचंद्र माने, (वय २५ वर्षे रा. मलठण ता. कर्जत) यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी नाना माने मिळून आला.
आरोपी विजय हुलगुंडे पळून गेला. त्यास कर्जत पोलिसांनी पाठलाग करून पकडला. आरोपींना कर्जत येथे आणून येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून ६० लाख रुपये हस्तगत केले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहे.