अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोमांसची तस्करी खुलेआम सुरु आहे. संबंधितांवर कारवाईसाठी आता अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. यातच पोलिसांकडून गोमांसची तस्करी अथवा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
यातच सुपा येथे बुधवारी दुपारी संभाजीनगर परिसरात गोमांस विक्री करताना सुपा पोलिसांनी छापा मारून विक्री करणारे पकडले. यावेळी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून गोमांस ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस नाईक यशवंत ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बुधवारी नगर-पुणे महामार्गावरील दौलत पेट्रोल पंपाच्या
पाठीमागील संभाजीनगर भागात दोन व्यक्ती गोमांस विक्री करत असल्याची खबर मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकात कोसे व खंडेराव शिंदे यांनी तात्काळ तेथे छापा टाकला.
त्याठिकाणी मांस विक्री करत असताना जावेद नजीर शेख (वय-28) व आबिद नजिर शेख (वय-25) रा. दोघेही संभाजीनगर, सुपा यांना अटक करून घेत गोमांस ताब्यात घेतले आहे.
ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून जावेद नजीर शेख व आबिद नजीर शेख यांच्याविरुध्दगुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकात कोसे पुढील तपास करत आहेत.