अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे.
बोठे याला अटक करण्यासाठी पोलिसांना ‘स्टँडिग वॉरंट’ हवे आहे. त्यासाठी पोलिसांनी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता ज्यावर आज सुनावणी होणार होती.
मात्र बोठे याच्याविरोधातील स्टँडिंग वॉरंटवर बुधवारनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
रेखा जरे हत्याकांडात गेल्या महिन्याभरापासून बोठे हा पसार आहे. बोठे हा मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्वतः चे मोबाईल तसेच वाहने घरीच ठेऊन तो पसार झाला.
गेल्या महिनाभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत असून पोलिसांची पाच पथके त्याचा शोध घेत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात पोलीस पथके रवाना केली आहे.
त्यातच एक भाग म्हणून बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु हा निर्णय आता बुधवारनंतर होईल, अशी शक्यता आहे.
‘स्टँडिंग वॉरंट’ नंतर बोठेच्या अडचणीत होणार वाढ या स्टँडिंग वॉरंट नुसार आता देश भरातील कोणताही पोलीस अधिकारी बाळ बोठे च्या नावचे वॉरंट लिहू शकणार आहे.
तसेच या स्टँडिंग वॉरंटच्या नियमानुसार बाळ बोठे याला फरार घोषित करून त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरु होईल.