१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जात आहे. शिवजयंती निमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक अमोल भारती यांनी १७ फेब्रुवारीला सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात शिवजयंती उत्सवात सहभागी होणाऱ्या संघटना व मंडळांची बैठक घेतली.यावेळी उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
तसेच काही बंधने देखील घातली आहेत.यात शिवजयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजेच्या आवाजावर मर्यादा ठेवावी.मिरवणुकीत लेझर शोचा
वापर करू नये.कुठलीही विटंबना होईल,अशी कृती करू नये.आक्षेपार्ह घोषणांचे पोस्टर्स, बॅनर्स लावू नयेत.अन्यथा संबंधित संघटना,मंडळांवर कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी शिवजयंती उत्सवात सहभागी होणाऱ्या संघटना व मंडळांना दिला आहे.

मिरवणुकीवर पोलिस ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवणार आहेत.
मिरवणूक काळात डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळावी.ध्वनी प्रदूषण केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.तसेच मिरवणुकीवेळी लेझर शोचा वापर करू नये.कोणत्याही धार्मिक स्थळांची विटंबना होईल,अशी कृती करू नये.आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत.भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह घोषणांचे पोस्टर्स, बॅनर्स लावू नयेत.
अन्यथा संबंधित संघटना अथवा मंडळाच्या प्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा उपअधीक्षक भारती यांनी यावेळी दिला. यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे आदी उपस्थित होते.
२५० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात शहरातून शिवजयंती मिरवणूक काढण्यासाठी ५ मंडळांनी पोलिसांकडे परवानगी मागितलेली असून या मिरवणुकीसाठी २ पोलिस उपअधीक्षक, ६ पोलिस निरीक्षक, २२ पोलिस उपनिरीक्षक यांच्या सह २५० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.