Ahmednagar News : अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक कैलास भास्कर वाकचौरे यानी काल संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा कारखान्याचे कार्यकारी संचालक कापडणीस यांच्याकडे दिल्याने अकोले तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे.
वाकचौरे यांच्या राजीनाम्याने अकोले तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून राजीनाम्याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे खंदे समर्थक असणारे वाकचौरे यानी पिचड यांची साथ सोडल्यावर त्यानी कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर व आमदार डॉ. किरण लहामटे, स्व. अशोक भांगरे यांना साथ देत अगस्ती कारखान्याची निवडणूक लढवली होती.
यात वाकचौरे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. शेतकरी समृध्दी मंडळाचा विजय झाला. पिचड यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर अचानक वाकचौरे यांनी राजीनामा दिल्याने अकोले तालुक्यात राजकीय भूकंपच झाला.
वाकचौरे आगामी काळात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी अकोले पंचायत समितीचे सभापती, अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती म्हणून काम केले असून अकोले तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.
त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पिचड यांची साथ सोडल्यानंतर ते राष्ट्रवादीत सक्रिय झाले खरे; पण ते अस्वस्थ असल्याची चर्चा होती. अमृतसागर दूध संघा निवडणुकीत त्यांनी माघार घेतली होती.
त्यांची भूमिका सातत्याने निर्णायक ठरत गेली असून अकोले तालुक्याच्या राजकीय पटलावर ते नेहमीच केंद्रस्थानी राहिले. त्यामुळे त्यांच्या या राजीनाम्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते येणाऱ्या काळात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.