अहमदनगर बातम्या

राजकीय गटबाजी नडली अन ‘त्या’शेतकऱ्यांवर आलीय भूमिहीन होण्याची वेळ…?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर : राजकीय अंतर्गत गटबाजीचा पाथर्डी तालुक्यातील जवळपास ५० हून अधिक शेतकऱ्यांच्या चांगलाच बसण्याची शक्यता आहे. कारण या शेतकऱ्यांच्या शेतीच्या सातबारा उताऱ्यावर आता महाराष्ट्र शासन, असा उल्लेख होणार असल्याने अनेक शेतकरी यामुळे भूमिहिन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मात्र या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.

दगडवाडी येथे दोन वर्षांपूर्वी दोन पाझर तलाव क्षेत्रामध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे २३४ एकर क्षेत्र असून, हे क्षेत्र पाझर तलावाच्या हद्दीत येत असल्याची तक्रार दगडवाडी येथीलच काहींनी महसूल विभागाकडे केली, त्यानंतर पुढील काही दिवस हे प्रकरण थंडावले होते.

मात्र, आठ दिवसांपूर्वीच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दगडवाडीत येऊन या दोन्ही पाझर तलावातील जमिनी व विहिरींची स्थळ पाहणी केली, त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाला हवा मिळाली आहे. या पाझर तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रावर महाराष्ट्र शासन असा उल्लेख झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी सेवा संस्था अथवा बँकेचे शेतीवर कर्ज घेतलेले आहे, त्या कर्जाची त्यांना तत्काळ परतफेड करावी लागणार आहे.

तसेच हे सर्व शेतकरी भूमिहीन होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे या लाभधारक शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडाली असून, गावच्या राजकीय अंतर्गत गटबाजीमुळेच या शेतकऱ्यांवर संक्रांतीअगोदरच संक्रात येते की काय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

अहमदनगर व नाशिक येथील महसूलच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची ठोस भूमिका घेतल्यास पन्नासहून अधिक कुटुंबांना याचा मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे दगडवाडी येथील काही लाभधारक शेतकऱ्यांनी राजकीय नेते मंडळींना भेटून यामध्ये मार्ग काढण्याची विनंती केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office