अहमदनगर : नेत्यांच्या दिवाळी फराळात विरोधकांची राजकीय आतिषबाजी, ‘अहमदनगर’च्या राजकारणात चांगलीच उलथापालथ

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण आता बदलत्या कालानुरूप बदलत चालले आहे. एकनिष्ठता , पक्षाशी निष्ठा आदी उदाहरणे अहमदनगर जिल्ह्यात होते. एक पक्ष व त्याच पक्षाशी निष्ठा ठेवणारे अनेक नेते अहमदनगर मध्ये होऊन गेले. परंतु आता बदलत्या कालानुरूप यात बदल झालेला दिसतो.

वरचे राजकरण जसे फिरले तसे खालचे राजकारण देखील फिरले, त्यामुळे सध्या पक्ष, मित्र आदी गोष्टी अहमदनगरच्या राजकारणात जास्त पाळताना दिसत नाहीत. नुकतेच अनेक नेत्यांचे दिवाळी फराळ पार पडले. परंतु हे दिवाळी फराळ होते की, राजकीय शक्ती प्रदर्शन हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

विशेष म्हणजे या दिवाळी फराळात आगामी खासदारकीच अर्थात लोकसभेचंच लॉबिंग दिसून आल. आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेते मंडळी एकत्र येताना दिसले.

आमदार राम शिंदे व आ. लंके यांचे फराळ विशेष गाजले

भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी व अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांनी आपापल्या गावात दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. परंतु या दोन्ही दिग्गजांच्या फ़राळाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. तस पाहिलं तर हे महायुतीमध्ये आज असे तरी पूर्वीचे ते राजकीय वैरी. परंतु दोघेही विखे विरोधक असल्याने एकत्र आले. एकमेकांच्या फराळाला जात दोघांनी एकमेकांचे तोंड भरून कौतुक केले.

मी व लंके एकत्र आल्याचा काय अर्थ काढायचा तो काढावा, परंतु मला लंके यांचे काम आवडले, मी फार प्रभावीत झालो आहे असे म्हणत आ. शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली. दोघांची राजकीय मैत्री वेगळ्या वळणावर आल्याची जाणीव जिल्ह्याला झाली व पुन्हा एकदा विखेंविरोधात हे दोघे लोकसभेला काम करतील असे भाकीत वर्तवण्यास सुरवात झाली.

कर्डिलेंच्या दिवाळी फराळात विखे जगतापांची चर्चा

माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या दिवाळी फराळात मंत्री विखे, खासदार विखे, माजी आमदार अरुण जगताप यांची मंदियाळी होती. परंतु यावेळी मंत्री विखे व जगताप यांच्या एकत्र बसून गप्पा रंगल्या व हीच गोष्ट चर्चेचा विषय झाली. सध्या महायुतीचे कारण जरी असले तरी मागील वेळी ते विखे विरोधात जगताप अशीच लढत झालेली होती. त्यामुळे येथेही पुन्हा आगामी आमदारकी व खासदारकीची भाकिते बांधली गेली.

विशेष म्हणजे आमदार शिंदे यांच्या फराळाला खासदार विखे व अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी एकत्रच हजेरी लावल्याने नेमकी राजकीय गणिते काय सुरु आहेत हे कुणालाच समजत नव्हते. एकीकडे शहर भाजप जगतापांना विरोध करते दुसरीकडे जगताप- विखे एकत्र फिरतात असे राजकारण सध्या दिसत आहे.

आ. रोहित पवारांची राजकीय आतषबाजी

राम शिंदे-निलेश लंके हे आमदार एकत्र येण्याच्या चर्चा जशा रंगल्या तशीच किंवा त्याहून अधिक चर्चा आ. पवार व विजय औटी यांच्या भाऊबीज कार्यक्रमाने रंगल्या. राम शिंदे-निलेश लंके एकत्र येणे हे आ. रोहित पवार यांना देखील रुचले नाही. त्यामुळे त्यांनी लगेच पारनेरमध्ये सूत्र हलवत भाऊबीजेला पारनेरमध्ये हजेरी लावली.

आमदार लंके यांच्यापासून दुरावलेले माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना एकत्र घेत तेथे पाठबळ दिले. त्यामुळे पुन्हा एकदा विजय औटी पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी चर्चा सुरु झाली.

दिवाळीत राजकीय आतषबाजी परंतु जनतेचा बुद्धिभ्रम

दिवाळीत फराळाच्या निमित्ताने राजकीय आतषबाजी सर्वानाच दिसली. परंतु हे होत असताना कोण कुणाचा, कोणत्या पक्षाचा, कोण कोणाला सपोर्ट करणार याचे मात्र गणित जुळले नाही. जनतेचा बुद्धिभ्रम निर्माण झाला. एकमेकांचे विरोधक असणारे एकमेकांच्या राजकीय दिवाळी फराळाकडे पाठ फिरवतात पण येथे मात्र वेगळेच चित्र दिसले. आपल्या आगामी राजकीय फायद्यासाठी विरोधकांना आपलेसे करत असल्याचे चित्र येथे दिसले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe