एकीकडे सर्व शेतीमालाचे भाव कोसळलेले असताना राहाता तालुक्यातील चितळी परिसरात डाळिंबाच्या बागा आजमितीला शेतकऱ्यांना कर्जाचे ओझे हलके होण्यास आधारवड ठरल्या आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात भूजल पातळीत घट झाली.
याचा परिणाम डाळिंब बहरावर झाला. त्यामुळे फळाचा आकार आणि वजन अपेक्षित वाढले नाही. यामुळे डाळिंबाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले. असे असले तरी गत वर्षीच्या तुलनेत डाळिंबाच्या मागणीत वाढ झाल्याने दरात वाढ झाली आहे.
आजमितीला व्यापारी जागेवर बागांची पाहणी करत खरेदी करत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. चागल्या फळास ८५ ते १०० रुपये प्रति किलो जागेवर दर मिळत आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना इतर शेतीमालाच्या तुलनेत समाधानकारक दर मिळत आहे.
एकीकडे बहुतेक शेती मालाच्या बाजारभावावर तीन वर्षांपासून मंदीचे सावट आहे. त्यात पिकेल ते विकेल या केंद्राच्या संकल्पनेला मार्केटमध्ये कुठेच स्थान नाही. वरून निसर्गाच्या आस्मानी संकटाची तलवार कायम मानगुटीवर बसलेली असते. सुलतानी संकट तर पाचवीला पुजलेले असल्याने या फळबागाधारकांना बाजारभावाने तारले आहे. सध्यातरी डाळिंब उत्पादकांना अच्छे दिन चालू आहे.
चाळीस अंश डिग्री तापमानात फळे व झाडांची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतली. भूजल पातळीत कमालीची घट झालेली असताना, पाण्याचे नियोजन करून प्रसंगी टँकरने विकत पाणी घेत, हजारो रुपयांची विविध औषधे फवारत, खतांची मात्रा देत शेतकऱ्यांनी डाळिंब बागा जगवल्या. आता या कष्टाचे चीज होत असल्याचे दिसत असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाने दिलासा दिला आहे.
दीड एकरात १७ टन डाळिंब साधारण दीड एकरात ६२५ झाडे जोपासली होती. त्यासाठी लाखो रुपये औषध फवारणी, खते व संगोपन करण्यासाठी खर्च आला असला तरी मागील दोन तीन वर्षात जेमतेम भाव मिळाला होता; मात्र चालू वर्षी उत्पादन योग्य निघून भावही समाधानकारक मिळाला आहे.
असे डाळिंब उत्पादक सुधीर वाघ म्हणाले.
रात्रीचा खडा पहारा
लाखो रुपये मातीत घालून शेतकरी आजमितीला शेती करत आहे. झाले तर लाख, नाहीतर राख. अशी परिस्थिती फळबागांसह शेती व्यवसायाची झाली आहे. त्यामुळे डाळिंब हार्वेस्टिंगच्या दरम्यान अनेक वेळा डाळिंबाची चोरी होती. जीव धोक्यात घालून रात्री हिंस्र प्राण्यांची भीती असली, तरी शेवटचा एक महिना रात्री खडा पहारा द्यावा लागतो. असे डाळिंब उत्पादक जीवन वाघ म्हणाले.
रविवारचे राहात्यातील डाळिंबाचे बाजारभाव
१ नं. : १७६ ते २५५ रु. (प्रतिक्रेट)
२ नं. : १११ ते १७५ रुपये
३ नं. : ५१ ते ११०
४ नं. : १० ते ५०