अहमदनगर बातम्या

पोपटराव पवार म्हणाले… आम्ही शाळेची सहलच राजभवनात घेऊन येऊ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :-  नगर दौऱ्यावर आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतीच आदर्शगाव हिवरेबाजारला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

ते म्हणाले, हिवरेबाजारच्या कामांची चर्चा जगभर होत आहे. मला खूप दिवसांपूर्वीच या ठिकाणी यायचे ठरवले होते. पण करोनामुळे शक्य झाले नाही.

मी हिवरे बाजारला काहीतरी नविन शिकण्यासाठी आलो आहे. पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, मला गावातील सर्व कामे पाहायची होती. येथील लोकांशी बोलायचे होते.

पण माझ्याकडे वेळेची मर्यादा असल्याने मला लवकर जावे लागत आहे. हिवरेबाजारला येऊन चांगले वाटले असे सांगत त्यांनी गावकर्‍यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

राज्यपालांनी पोपटराव पवार यांच्या कामांचा वारंवार उल्लेख करून त्यांचे कौतुक केले. शाळेतील मुलांना राजभवनात येण्याचे आमत्रंण दिले.

तसेच शाळेसाठी त्यांनी पाच लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी पोपटराव पवार यांनी आम्ही शाळेची सहलच राजभवनात घेऊन येऊ, असे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने, पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, जिल्हाधिकारी माधवराव लामखडे, हिवरेबाजारच्या सरपंच विमल ठाणगे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office