अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार हे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले असून सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी काढलेले अधिकारी पदस्थापना बाबतचे चार आदेश जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राजेंद्र भोसले यांनी रद्द केले आहेत.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने उपायुक्त प्रदीप पठारे यांनी बुधवारी (दि.6) याबाबतचा आदेश जारी केला आहे. आयुक्त मायकलवार यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी विविध आदेश काढले. तसेच काही निर्णयांच्या फाईलींवर स्वाक्षर्या केल्या. आयुक्त मायकलवर 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले.
त्याच दिवशी त्यांनी आस्थापना विभागप्रमुख मेहर लहारे यांची सचिव कार्यालयात बदली केली, तर आस्थापना विभागाचा कार्यभार सहायक आयुक्त सचिन राऊत यांच्याकडे सोपवला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे आरोग्य विभागाचा संपूर्ण कार्यभार सोपवून त्यांना पाच लाखांचे आर्थिक अधिकारही दिले.
या आदेशानंतर नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभारी भार आहे. त्यांनी मायकलवार यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी दिलेल्या आदेशांना स्थगिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिकेत विभागप्रमुखांची बैठक घेतली.
यावेळी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, संतोष लांडगे, सहायक आयुक्त सचिन राऊत, दिनेश सिनारे, डॉ. नरसिंह पैठणकर, प्रवीण मानकर, सुरेश इथापे, कल्याण बल्लाळ, रोहिदास सातपुते, शहाजहान तडवी, मेहेर लहारे, अशोक साबळे, नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर आदी उपस्थित होते.