Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यात तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत पोचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा जेष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
त्यातच पाथर्डी शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे,. रात्री- अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यावाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
पाथर्डी व उपनगरातील रहिवाशी भागात गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच वीजपुरवठा न सूचना देता खंडित केला जात आहे. साधारणतः तीन ते पाच तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. पाणी टंचाईमुळे साठवण केलेले पाणी वापरता येत नाही.
बोअरवेल चालू करता येत नसल्याने उपनगरात पाण्याच्या प्रश्न उद्भत आहे. पाण्याअभावी महिला वर्गाची कामे रखडतात. तर शासकीय कामासाठी आलेल्या लोकांना झेरॉक्स, टायपिंग, संगणकावरील कामासाठी तासनतास किंवा दोन दोन दिवस चकरा माराव्या लागत आहेत.
त्यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक घराच्या बाहेर पडायला तयार नाहीत, त्यातच वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे घरातील विजेची उपकरणे बंद पडतात.
फॅन, कुलर, एसी चलत नसल्याने लोकांची खास करून वयोवृद्ध व लहान मुलांचा जीव कासावीस होत आहे. टीव्ही व मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे करमणुकीचे ही साधने बंद पडत असल्याने लहान खेळकर मुले बाहेर पडून उन्हाच्या त्रासाने आजारी पडत आहेत.
सततचे भारनियमन व दुरुस्तीच्या कामामुळे वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण आणि इतर कारणांमुळे कायमच वीजपुरवठा बंद असतो. त्यामुळे भारनियमनाच्या संकटाबरोबर इतर सुल्तानी संकटांशी नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. ऐन उन्हाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे लोक आजारी पडू लागली आहेत. आधीच दुष्काळ, पाणी नाही, त्यातच या विजेच्या लंपडावाने दवाखान्याचा खर्च परवडणारा नाही. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.