अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- कोरोनाच्या भयानक संकटात देखील कर्तव्यापासून बाजूला न जाता प्रामाणिकपणे कर्तव्य निभावल्याची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने दखल घेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांना नुकतेच प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
कोविड संकटात शेतकर्यांना विविध समस्या भेडसावत होत्या. परंतु, कोरोना योद्धे म्हणून पहिल्या फळीत काम करताना शेतमालाचा तात्काळ पुरवठा होण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन केले.
विविध छोट्या-मोठ्या कंपन्यांशी संपर्कात राहून शेतमालाची विक्री करुन देत शेतकर्यांना दिलासा दिला. कडक टाळेबंदीच्या काळात जीव धोक्यात घालून शेतकरी गटांच्या माध्यमातून शिल्लक राहिलेला भाजीपाला गोरगरीबांना घरपोहोच केला.
मध्यंतरी झालेल्या अवकाळीचे पंचनामे करुन शासनास अहवाल सादर केला. या सर्व उल्लेखनीय गोष्टींची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविले आहे. याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.