अहमदनगर बातम्या

प्रतापराव ढाकणे झाले आक्रमक ! म्हणाले रस्त्याचे काम सुरू न झाल्यास …

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर या महत्त्वाच्या रस्त्याचे रखडलेले काम हे येत्या आठवडयात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू, त्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी केले.

तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर रस्ता अतिशय महत्त्वाचा रस्ता असून, टाकळीमानुर पाथर्डी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. परिसरातील जवळपास २५ गावे व वाडी – वस्त्यांचा या बाजारपेठेशी थेट संबंध येतो.

मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. त्यावरून जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झालेला पाहायला मिळतो. आता हा विषय राजकीय दृष्ट्याही कळीचा मुद्दा ठरत असून, विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी मागील पंधरवड्यात करोडी येथे पाथर्डी-बीड हा राज्यमार्ग अनेक तास अडून धरला.

या वेळी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर परिसरातील जनतेचाही पाठिंबा मिळाला. त्यावेळी आम्ही तालुका प्रशासनाला पंधरा दिवसांचा अवधी काम सुरू करण्याठी दिला होता.

शनिवारी सकाळी अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयाचा पाठपुरावा केला. मात्र, अजूनही रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश जारी झाला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ढाकणे यांना दिली.

त्यावर ढाकणे यांनी बोलताना सांगितले की, सोमवारपासून पुढील आठवड्यात कार्यारंभ आदेश पारित करून प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही तर मी स्वतः काम सुरू करण्यासाठी कोणत्या स्वरूपाचे आंदोलन करीन, याची कल्पना प्रशासनालाही नसेल. मात्र, हे अतिशय तीव्र आंदोलन ठरेल, याची जाणीव प्रशासनाने ठेवावी.

रस्त्याच्या कामासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. मर्जीतील लोकांना काम मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासूनजनतेला वेठीस धरले आहे.

त्यामुळे टाकळीमानुरच्या बाजारपेठेवरही विपरीत परिणाम झालेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून टाकळीमानुरचे ग्रामस्थ, शेतकरी व व्यापाऱ्यांना अनेक किलोमीटरचा वळसा घालून टाकळीमानुर गाठावे लागते.

एकीकडे हजारो कोटींची कामे केल्याचे आपण सांगता, मग या कामासंदर्भात आपली भूमिका आजपर्यंत आपण जाहीर का केली नाही, याचा खुलासा लोकप्रतिनिधींनी करावा, पुढील आठवड्यात प्रत्यक्षात काम सुरू न झाल्यास

आपण तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि हे आंदोलन कामतडीस निगेपर्यंत सुरूच ठेवून, असा इशारा ढाकणे यांनी शेवटी बोलताना दिला.

Ahmednagarlive24 Office