Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांची जानेवारी ते डिसेंबर २३ पर्यंत मुदत संपत असून, येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी प्रशासना मार्फत तयारी सुरू असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.
याबाबत ते म्हणाले की, शेवगाव तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची मुदत लवकरच संपत असून, यामध्ये एरंडगाव समसूद व शेकटे खुर्द, या २ ग्रामपंचायतींचे नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण निश्चित होत नसल्याने या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका काही काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.
उर्वरित २५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून, मुदत संपणाऱ्या एकूण २७ ग्रामपंचायतींची नावे व त्यांची मुदत संपण्याची तारीख पुढीलप्रमाणे. हिंगणगाव ने, देवटाकळी, शहरटाकळी, बालमटाकळी, ढोरसडे/ अंत्रे, मुंगी, कऱ्हेटाकळी, खरडगाव, थाटे,बोधेगाव, वडुले खुर्द, वरूर बु. भगूर, लोळेगाव, सामनगाव, एरंडगाव भागवत, लाखेफळ, वडुले बु., खडके मडके,
लाडजळगाव, आव्हाणे बु., बऱ्हाणपुर, दिवटे, गोळेगाव, एरंडगाव समसूद, या गावांचा समावेश असून, यातील काही ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या असून, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक काम पाहत आहेत.
यामध्ये एरंडगाव समसुद व शेकटे खु. या २ ग्रामपंचायती वगळता २५ ठिकाणी निवडणुकीची प्रशासनामार्फत तयारी सुरू असून, दि. १ जुलै २३ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरून ती यादी निवडणुकीसाठी निश्चित करण्यात येणार आहे.
२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ८८ प्रभाग निश्चित केले असून, ६७ हजार ९४३ मतदार या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी ४४० कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली असून, २३७ सदस्यांसह २५ लोक नियुक्त सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने निवडणूक होत असलेल्या २५ गावांमध्ये निवडणुकीबाबतची मोर्चेबांधणी सुरू झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तालुक्यात वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असलेले माजी आमदार घुले बंधूंची वरिष्ठ पातळीवरील राजकीय भूमिका काय राहते,
हे अजून निश्चित न झाल्याने स्थानिक पातळीवर काम करणारे घुले बंधूंचे समर्थक निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच थोड्या दिवसांत होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मोठी रंगत येणार असल्याने कोणाचे पारडे जड ठरते, हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.