संत ज्ञानेश्वर मंदिर विकासासाठी हजार कोटींचा आराखडा तयार करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर विकास कामांना गती देण्याचा माझा प्रयत्न असून तीर्थक्षेत्र विकास झाला तर व्यवसाय वृद्धी होईल.

इतरांना कामे मिळतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सातशे ते हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करा, अशा सूचना महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात आगमन झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने पांडुरंग अभंग यांनी मंत्री विखे पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन तर तालुका भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी व पदाधिकाऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविले. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग हे होते.

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, डॉ. कोलते, बाळासाहेब भदगले, अंकुश काळे, अॅड. अण्णासाहेब अंबाडे, मंदिर विश्वस्त रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, कृष्णाभाऊ पिसोटे, देविदास साळुंके, राजेंद्र मुथा यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज भक्त परिवाराच्या वतीने समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी नेवासकरांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत केले. तर ज्ञानेश्वर सृष्टीसाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नेवासकरांच्या वतीने आभार मानले.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, ज्या माऊलींनी येथून विश्वासाठी प्रार्थना केली. त्या माऊलींच्या भूमीबद्दल प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे, ज्या भूमीतील संत गुरुवर्य भास्करगिरी बाबांना अयोध्येत मान मिळाला हे महाराष्ट्रासह या नेवासा भूमीचे भाग्य असून सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा विकास कामाला गती मिळाली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे, यासाठी देवस्थान विश्वस्त मंडळींशी चर्चा करण्यासाठी आपण बैठक घेऊ, यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,

अशी ग्वाही देत त्यांनी यासाठी किमान सातशे किंवा हजार कोटी खर्चाच्या कामाचा आराखडा तयार करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.