अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष भास्कर मोरे याला अखेर बेड्या, ‘असा’ घेतला ताब्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.१३) सायंकाळी अटक केली आहे. त्याला भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नदीपच्या कारभाराची व घडलेल्या घटनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची ग्वाही उपोषणकर्ते पांडुरंग भोसले व विद्यार्थ्यांना दिली असल्याची माहिती समजली आहे.

विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाले की, आंदोलन, उपोषण मागे घेतले जाईल, असे पांडुरंग भोसले यांनी जाहीर केले. बुधवार आंदोलनाचा नववा दिवस होता.

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनसह अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या अनेक तक्रारी होत्या. एका विद्यार्थिनीने मोरे याच्या विरोधात विनयभंगाची फिर्याद जामखेड पोलिस ठाण्यात दिली होती, तसेच वन विभागामार्फतही एक गुन्हा दाखल झाला होता.

विद्यार्थ्यांसह पांडुरंग भोसले यांनी गेल्या नऊ दिवसांपासून डॉ. मोरे याला अटक करावी व विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाकडे असलेल्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी जामखेडमध्ये उपोषण सुरू केले होते. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आमदार प्रा. राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी रत्नदीप संस्थेकडून शैक्षणिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ कसा केला जातो याचा पाढा वाचला. यावेळी आमदार शिंदे यांनी पोलिसांना फोन केला. त्यावेळी डॉ. भास्कर मोरे याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी शिंदे यांना दिली.

त्यांनी ही माहिती विद्यार्थी व उपस्थित नागरिकांनी देताच एकच जल्लोष झाला. यावेळी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी आभार मानत डॉ. मोरेची चौकशी करून फाउंडेशनच्या इतर सहा संचालकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.

दरम्यान, ही घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी असून शिक्षण संस्थेसाठी ही काळिमा फासणारी घटना असल्याचे आ. शिंदे यांनी म्हटले आहे. याबाबत कडक कारवाई व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तंत्रशिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत दोन दिवसांत कारवाई करतो, असे सांगितले असल्याची माहिती आ. शिंदे यांनी यावेळी दिली.

Ahmednagarlive24 Office