अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- सौर प्रकल्पामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची 24 तास अखंड वीज पुरवठ्याची गरज पूर्ण होणार आहे.
वीज बिलाचा कायमस्वरूपी प्रश्न मिटावा, पर्यावरण पूरक ग्रीन एनर्जी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात पर्यावरण पूरक सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात 97 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ग्रामीण भागात या केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत असून त्याठिकाणी 24 तास वीजपुरवठा आवश्यक आहे.
यासह केंद्रांना वीज बिलापोटी दर महिन्यांला 7 ते 8 हजार रुपयांचे खर्च येत होता. हा खर्च कायम स्वरूपी बंद होवून अखंडपणे वीजेचा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्रयत्न केले.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीतून नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषदेला 10 कोटींचा निधी मिळाला. या निधीतून 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊजेतून प्रकल्प उभे करण्यात येत आहेत.
यामुळे वीजेच्या बाबतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम होणार आहेत. जिल्ह्यात 97 प्राथमिक आरोग्य केंद्र असून पहिल्या टप्प्यात 68 केंद्राचा यात समावेश करण्यात आला असून उर्वरित केंद्रासाठी निधी उपलब्ध झाल्याबरोबर त्याठिकाणी सौर प्रकल्प उभे राहणार आहेत.