अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्याला जबाबदार असणार्या पोलीस अधिकार्यांच्या विरोधात सात दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देऊनही या अधिकार्यांविरुद्ध कारवाई न झाल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
अधिकार्यांविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी कि, संगमनेरातील कत्तलखान्यास जबाबदार असणार्या पोलीस अधिकार्यांविरुद्ध कारवाई न झाल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, तहसीलदार अमोल निकम या तीन अधिकार्यांनी आंदोलकांची भेट घेतली.
गेट समोर आंदोलन करू नका, आत बसा अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली. मात्र ही विनंती कार्यकर्त्यांनी धुडकावून लावली. दरम्यान सायंकाळी स्थानिक अधिकार्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
पोलीस निरीक्षक यांचे निलंबन करता येत नसेल तर त्यांना जिल्हा मुख्यालयात बोलवा असे कार्यकर्त्यांनी सुचविले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रतिसाद देत नाहीत.
त्यांनी संगमनेर मध्ये येऊन आमच्याशी चर्चा करावी, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरु होते.