Ahmednagar News : ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.०१ या बंद स्थितीत असलेल्या योजनेतून ९ ऐवजी १३ गावांना आता पाणी मिळू शकते. तसेच सदरची योजना ही तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असल्यामुळे तसेच जुन्या योजनेचे बहुतांशी कामे, साधने पुन्हा वापरात येणार असल्याने
या योजनेवर शासनाचा खर्च व्यपगत न होता दुष्काळग्रस्त १३ गावांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अशा आशयाचा प्रस्ताव शासनाच्या वतीने तयार करण्यात आला असल्याची माहिती जि.प.सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी दिली आहे.
पुढे बोलतांना सौ. काकडे म्हणाल्या की, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १ या बंद स्थितीत असलेल्या योजनेमध्ये आखेगाव, खरडगाव, सालवडगाव, वरूर बु., वरूर खु., मुर्शतपुर, थाटे, वाडगाव, हसनापूर ही गावे आहेत.
त्यामध्ये कोळगाव, मंगरूळ खु., मंगरूळ बु. व पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी ही गावे नव्याने समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठविण्यात आलेला होता. सदरचा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी नुकताच अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई यांना सादर केलेला आहे.
ही योजना तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे शासनास कळविण्यात आलेले आहे. ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. १ व २ द्वारे तालुक्यातील अनुक्रमे २७४४ हेक्टर ९ गावांना व ६९६० हेक्टर २० गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
या गावातील बंधाऱ्यांची क्षमता १२८ द.श.ल.क्ष. घनफूट असून, ९७ संख्या आहे. या योजनेमुळे अंदाजे ९१७ हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. या योजनेसाठी अंदाजे १२५.८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षापासून अॅड. डॉ. शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली पाणी कृती समितीने सातत्याने चळवळ उभी करून संघर्ष उभा केला आहे.
या संघर्षाला यश मिळवण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत अॅड. काकडे यांनी मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण पत्रव्यवहार सादर केला असून, योजनेस लवकरात लवकर मान्यता देण्यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह धरला आहे. त्यांच्या या चिकाटीच्या प्रयत्नांबद्दल १३ गावातील शेतकरी गौरोद्गार काढत आहेत. त्यामुळे या गावांना लवकरच पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.