Ahmednagar News : अहमदनगर संभाजीनगर महामार्गावरील शिंगवेतुकाई परिसरातील हॉटेल मातोश्रीवर वेश्या व्यवसाय चालू असल्याच्या माहितीवरून शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा व सोनई पोलिसांनी शुक्रवारी दुपारी कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उपअधीक्षक पाटील यांना कुंटनखाण्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील माहिती गोळा करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली,
की सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील महामार्गावरील शिंगवेतुकाई परीसरातील हॉटेल मातोश्री लॉजिंगमध्ये महेश गवळी व सुरज आल्हाट हे दोघे महिलांकडून कुंटनखाना चालवून पैसे कमवत आहेत.
या माहितीवरून पोलीस अधिकारी पाटील यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक डोईफोडे व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना याठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
पोलीस पथक व दोन पंचांसह शिंगवेतुकाई एमआयडीसी परीसरांतील हॉटेल मातोश्री लॉजिंगवर छापा टाकला. यावेळी रुममध्ये ४ पीडीत स्त्रिया, गिऱ्हाईक तसेच अनैतिक व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.
महेश शिवाजी गवळी (वय २५, रा. कांगोणी, ता. नेवासा), सुरज बापु आल्हाट (वय २७, रा. घोडेगाव, ता. नेवासा) हे महिलांकडून वेश्या व्यवसाय चालवत असल्याने पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुरनं. ४५७ / २०२३ नुसार स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.