उन्हाळ्यात जनावरांना डिहायड्रेशनपासून वाचवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : गेल्या महिनाभरापासून वाढत्या उन्हाचा त्रास मानसांसह जनावरांना देखील होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कमी-अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जनावरांनाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पशुधन विभागाकडून केले आहे.

बाहेरील तापमानाला जुळवून घेण्यासाठी जनावरांच्या शरीरातून घाम निघतो. परंतु जनावरांना शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी ठराविक प्रमाणात पाणी आवश्यक असते. कडक उन्हामुळे शरीराची पाण्याची गरज वाढलेली असते.

मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नाही. जर कमी प्रमाणात पाणी घेतले किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ते गमावले तर त्याचा परिणाम डिहायड्रेशनमधे होतो.

जनावरांच्या लघवी, मल, घाम; तसेच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जाते. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावतात.

शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे. मात्र पाणी जर जास्त प्रमाणात शरीरातून बाहेर पडत असेल तर मात्र डिहायड्रेशनचा त्रास होतो. डिहायड्रेशनमुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइडची पातळी असमतोल किंवा कमी होते.

त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. जनावराला डिहायड्रेशन झाल्यानंतर त्वचेची लवचिकता कमी होते. वजन कमी होणे आणि डोळे कोरडे होतात. त्वचा निस्तेज होते, डोळे खोलवर जातात. तोंडातून लाळ येणे, अशी लक्षणे दिसतात. डिहायड्रेशन झाल्यामुळे जनावर अचानक खाली पडू शकते.

त्यामुळे उन्हाळ्यात गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी जास्त जागा द्यावी. एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास, उष्णता कमी होण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे जनावरांना जास्त उष्णता जाणवते. गोठा हवेशीर असावा.

गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी गोठ्यामध्ये पुरेशी जागा असावी. त्यामुळे जनावरांना श्वसनाचा त्रास होणार नाही. गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा. त्यामुळे उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांतील उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो.

गोठ्याच्या छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकावे, त्यावर पाणी शिंपडावे. असे केल्याने छताचे तापमान जास्त वाढत नाही आणि गोठा थंड राहतो. अशा प्रकारचे साधे उपाय केले तर आपल्या जनावराला डिहायड्रेशन पासून वाचवता येत. आणि उत्पादनात येणारी घट कमी करता येते, असे पशुवैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

अशी करा उपाययोजना

जनावरांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांना स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात गोठ्यामध्ये उपलब्ध करून द्यावे. मुक्त संचार गोठ्यातील पाणी थंड राहावे, यासाठी पाण्याच्या टाक्या सिमेंटच्या असाव्यात. जनावरे थेट सूर्यप्रकाशात येणार नाही याची काळजी घ्यावी.

जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावे. पाण्यात मीठ, साखर किंवा गूळ टाकावा. चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरीरात जास्तीची उष्णता तयार होते. त्यामुळे जास्त चावावा लागणारा चारा सकाळी किंवा सायंकाळी द्यावा. तसेच दुपारच्या वेळी जनावरांना शेतात चरण्यासाठी पाठवू नये, असा सल्ला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.