अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- निर्मलनगर येथील मागासवर्गीय ठोकळ कुटुंबियांना जातीयद्वेषातून मारहाण झाल्याचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून निदर्शने करण्यात आली.
सदर आरोपींवर अॅट्रोसिटी अॅक्ट व मोक्कातंर्गत कारवाई करण्याची व विविध मागण्यांची मागणी करण्यात आली. यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलीम सय्यद, रफिक शेख, चंद्रकांत सकट, प्रमोद शेंडगे,
नागेश वायदंडे, रंगनाथ वायदंडे, मंदाकिनी मेंगाळ, रवींद्र भालेकर, दत्तात्रय बोरुडे, अविनाश लोंढे, बी.एस. विटेकर, बंडू पाटोळे, नामदेवराव चांदणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
निर्मलनगर येथे गेली अनेक वर्ष मागासवर्गीय समाजातील ठोकळ कुटुंबीय राहत आहे. या भागात मागासवर्गीय समाजाचे कुटुंब मोजके असल्याने त्यांच्यावर नेहमीच जातीयद्वेषातून आरोपी दिपक सावंत त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतो. नुकतीच ठोकळ कुटुंबीयांना आरोपी व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी मारहाण करुन घराचे नुकसान केले.
त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या. सदर आरोपींवर अॅट्रोसिटी अॅक्ट व मोक्कातंर्गत कारवाई व्हावी, आळे (जि. पुणे) येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आल्हाट यांच्या आंदोलनाची दखल घेऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा मिळावी,
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील दलित मतिमंद मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करणार्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, बीड जिल्ह्यातील माजलगाव हिवरा येथे गाळपेर काढणार्या मातंग समाजातील लोकांना गावातील सवर्ण समाजातील 31 गाव गुंडांनी जबर मारहाण केली असता
या सर्व आरोपींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, मातंग समाजातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, मातंग समाजाला स्वतंत्रपणे अ,ब,क,ड नुसार आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.