अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे भरत खाकाळ, अशोक डोंगरे, महेश घावटे, प्रकाश फराटे, राजेंद्र कर्डिले, सुचिता शेळके, अश्विन शेळके, संदीप कनोजिया, दिलीप घुले, शकील शेख आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात पावसाची सुरुवात झाल्यानंतर शेतकर्यांनी पेरणी केली. सोयाबीनचे निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकर्यांना दिल्याने पीके आले नाहीत.
शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. सोयाबीन सोबतच मूग, उडीद हे पिके बर्यापैकी आले होते. परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस आल्यामुळे शेतकर्यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वी खराब झाली. विदर्भात व इतर भागात सोयाबीनवर कीड आल्यामुळे सोयाबीनची कापणी विना नांगरणी करावी लागली.
पावसामुळे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागातील कपाशीचे पिके पुर्णत: सडले. संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे अनेक पिके पाण्याखाली गेले. तसेच गावातील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटानंतर या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत,
सोयाबीन, धान व कपाशी खरेदी हेतु सरकारी यंत्रणा उभी करावी, पूर्व विदर्भात मानव निर्मित पुरामुळे झालेले नुकसान भरपाई कोकणात दिलेल्या मदतीप्रमाणे देण्यात यावी, राज्यात झालेल्या फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,
ज्या शेतकर्यांना मागच्या दोन कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी व शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved