अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगरमधील भिंगार शहरात शनिवारी सकाळी लागलेल्या भयानक आगीत ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे त्यांच्या दुःखात भारतीय जनता पार्टीत सहभागी आहे.
दुकानदारांची झालेले नुकसान कधीही भरून न येणारे आहे. भारतीय जनता पक्ष सर्व दुकानदारांच्या मागे उभा रहात मदत करणार आहे. दुकानदारांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिले.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भिंगार येथील नेहरू मार्केट येथील घटनास्थळी भेट देऊन आगीच्या भक्षस्थानी गेलेल्या दुकानदारांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, भिंगार छावणी परिषदेचे मुख्याधिकारी विद्याधर पवार यांच्याशी संपर्क करून परिस्थितीच्या गांभीर्याची माहिती दिली. तसेच तातडीने घटनेचा पंचनामा करून दुकानदारांना त्वरित मदत करावी अशी विनंती केली.
यावेळी उपस्थित वसंत राठोड म्हणाले, शनिवारच्या पहाटे नेहरू मार्केट येथे दुकानांना लागलेल्या आगीमध्ये सर्वसामान्य दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी पहाटे आग लागल्यावर तातडीने मदतकार्य सुरू केले. दुकानदारांचे झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने त्वरित द्यावी.
करोना मुळे आधीच सर्व दुकानदार संकटात सापडले आहेत. या घटनेमुळे येथील दुकानदार अधिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे तातडीने दुकानदारांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.