अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचे नाते आवश्यक आहे आणि हा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. अत्याधुनिक साधने आणि कुशल डॉक्टर्सने सुसज्ज विभागामुळे चांगली सेवा मिळत असल्याचेही ते म्हणाले.
अहमनदनगर शहरातील सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि अॅपल हॉस्पिटलचे उद्घाटन खासदार पवार यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुरभि हॉस्पिटलच्या विस्तारित इमारत लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण,
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, दादाभाऊ कळमकर, माजी आमदार पांडुरंग अभंग, राहुल जगताप, डॉ. राकेश गांधी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुणकाका जगताप हे होते. तर अॅपल ह़ॉस्पिटल उद्धाटनप्रसंगी या मान्यवरांसोबतच ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख,
प्रशांत गडाख, डॉ.सुनील गडाख आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, नागरिकांना चांगली आरोग्य सेवा या निमित्ताने मिळणार आहे. मात्र, त्याचबरोबर विश्वासाचे नाते निर्माण करावे लागणार आहे. कोरोना काळात राज्यात अनेकांनी चांगली आरोग्य सेवा दिली. मात्र, अजूनही धोका संपलेला नाही.
ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी किमान पुढचे दोन-तीन महिने काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना काळात अर्थचक्र विस्कळित झाले. त्यामुळे घराबाहेर पडून राज्याच्या विविध भागातील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना आरोग्य सेवेसंदर्भात निकड पटवून दिली.
त्यांनीही पुढाकार घेऊन राज्य शासन आणि प्रशासनाच्या बरोबरीने या कोरोना विरुध्दच्या लढाईत भाग घेतला, असे त्यांनी सांगितले. ग्रामविकासमंत्री श्री.मुश्रीफ यांनी प्रशासनाच्या बरोबरीने येथील वैद्यकीय व्यावसायिकांनी कोरोनाचा सामना केला. त्यामुळे आज आपण कोरोनाला हद्दपार करण्याच्या तयारीत आहोत.
मात्र, अद्याप धोका संपलेला नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन आरोग्य यंत्रणेने दिलेला सल्ला मानला पाहिजे, असे स्पष्ट केले. गोरगरिबांना सवलतीत उपचार करण्यासंदर्भातील भूमिका मोठ्या हॉस्पिटल्सनी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. आमदार जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुरभि हॉस्पिटलच्या हेल्थ कार्डचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अॅपल हॉस्पिटलच्या उद्धाटनप्रसंगीही श्री. पवार यांनी कोरोना काळात या हॉस्पिटलने केलेल्या रुग्णसेवेचे कौतुक केले. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डॉक्टर्स जो सल्ला देतील तो ऐकूया, असे त्यांनी सांगितले.