संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुलगी बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमीवर या मुलीचे अपहरण करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, तसेच राज्यात लव्ह जिहादचा कायदा लागू करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एक मुलगी बेपत्ता झाली आहे. या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली होती. आरोपीविरुद्ध कारवाई न केल्यास जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.
पोलिसांकडून याबाबत कारवाई न झाल्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आंबी खालसा ते घारगाव असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटना व पक्षांचे कार्यकर्ते तसेच पठार भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळीच आंबी खालसा येथे एकत्र आले होते. घोषणा देत या मोर्चास आंबी खालसा येथून प्रारंभ झाला. आंबी खालसा ते घारगाव असा हा मोर्चा काढण्यात आला. घारगाव बसस्थानक परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.
या मोर्चामध्ये पुणे येथील गोरक्षक मिलिंद एकबोटे, एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष योगेश सूर्यवंशी, रोहिणीताई महाराज राऊत, सुरेश कालडा, गुलाब भोसले, बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल खताळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर डोके, सुरेश कानडा, गुलाब भोसले, आंबी खालसा ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब ढोले, रमेश आहेर, सुरेश कान्होरे, राजेंद्र बोडके आदी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घारगाव बस स्थानक परिसरात झालेल्या निषेध सभेत अनेक वक्त्यांनी मुलीच्या अपहरण प्रकरणाचा कठोर शब्दात निषेध केला. या प्रकरणातील आरोपींवरुद्ध कठोर कारवाई करावी, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडकर यांची बदली करावी, लव्ह जिहाद कायदा त्वरित लागू करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी योगेश सूर्यवंशी म्हणाले, मुलीच्या अपहरण प्रकरणाची सर्व माहिती आम्ही घेतली. हिंदूंच्या मुली पळविण्याचे षडयंत्र सुरू आहेत. आरोपींचा बंदोबस्त वेळेत करावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा यावेळी सूर्यवंशी यांनी दिला.
कुलदीप ठाकूर म्हणाले, हा जन आक्रोश मोर्चा फक्त ट्रेलर आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर यानंतर आम्ही मोर्चा काढणार नाही. मुली पळविणाऱ्यांचा आमच्या पद्धतीने बंदोवस्त करू, असा इशारा ठाकूर यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी मिलिंद एकबोटे, रोहिणीताई महाराज राऊत, किशोर डोके, गुलाब भोसले, सुरेश कालडा यांची भाषणे झाली. श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवमें, संगमनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यावेळी उपस्थित होते.