अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- सध्या वाळू तस्करी, अवैध मुरूम उत्खनन आदी अवैध प्रकार जिल्ह्यात सर्वत्र सुरु असल्याचे वास्तव आहे. पोलीस, महसूल प्रशासन यावर कडक कारवाई करताना दिसून येतात.
परंतु या लोकनावर मात्र जरब बसताना दिसत नाही. देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरातून अवैधरित्या रोज हजारो ब्रास मुरूम उचलला जात आहे. या मुरूम माफीयांवर आठ दिवसांत कारवाई करा अन्यथा राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देवळाली प्रवरा शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना त्यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात कराळे यांनी म्हटले, गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून परिसरात मुरूम माफियांनी हैदोस घातला आहे.
मुरुमाच्या डंपर मुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असुन प्रवाशांच्याही जीविताला धोका आहे. मागे एकदा प्रशासनाने आळा घातला होता. परंतु त्यानंतर रस्त्यावर, गोठ्यात व घरासमोर मुरूम टाकण्याची मागणी वाढल्याने मरूम माफियांनी पुन्हा डोके वर काढले व कारखान्याच्या बेणे मळ्याशेजारील असलेल्या मोकळ्या जागेतून अवैधरित्या मुरूम वाहतूक सुरू झाली.
मागणी वाढती असल्याने एका डंपरचे चार ते पाच हजार रुपये प्रमाणे विक्री करण्यात येत असून रोज वीस ते पंचवीस डंपर मुरूम वाहतूक करीत आहेत. यामुळे शासनाचा रोज कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. मुरूम तस्करीला तहसीलदार यांनी
तातडीने आळा घालून मुरूम माफियांच्या आठ दिवसांत मुसक्या न आवळल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असे कराळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved