Ahmednagar News : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी व आता मनसे अशा दिग्गज पक्षांना आपल्या सोबत भाजपने घेतले आहे.
परंतु हे एकीकडे सगळे होत असताना नाराज नेत्यांची संख्या वाढत आहे. या नाराज नेत्यांना पुन्हा शांत करणे हे भाजपपुढे मोठे आवाहन आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मॅरेथॉन बैठका घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे नाराज नेतेमंडळींची सागर बंगल्यावर मांदियाळी पाहायला मिळत आहे.
१) अहमदनगरमधून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भेटीला
अहमदनगर लोकसभा मतदार संघातून भाजपने सुजय विखे यांना खासदारकीची उमेदवारी दिली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून अहमदनगरमधील भाजपमधील नाराजी समोर येत आहे. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सागर बंगल्यावर बैठकीसाठी गेलेले होते.
अहमदनगरमधून खा. सुजय विखे व निलेश लंके अशीच शक्यतो लढत पाहायला मिळणार आहे. परंतु भाजपमधील आ. राम शिंदे व निलेश लंके यांची मैत्री सर्वश्रुत आहे. तसेच राम शिंदे हे स्वतः खासदारकी लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी स्वतः बोलून दाखवले होते.
त्यामुळे आता आ. शिंदे भाजपमधून नाराज असून ते विखे पाटील यांचे किती काम करतील याबाबत बहुतेक विखे पाटील यांच्या मनात शंका असेल अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्ये असणारी नाराजगी बाबत चर्चा करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर धाव घेतल्याची चर्चा आहे.
२) माढा व रत्नागिरीबाबतही चर्चा
माढा व रत्नागिरीमध्ये देखील नाराजगी वाढत चालली असल्याचे चित्र आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी भाजपकडून मिळालेली असून मोहिते पाटलांचा एक गट तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
तसेच भाजप आमदार राम सातपुते हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले असल्याने फडणवीस सध्या अनेक मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी कंबर कसत आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या जागेवरुनही महायुतीमध्ये तिढा दिसत असून येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील सागर बंगल्यावर हजेरी लावली आहे.