अहमदनगर बातम्या

राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या मॅनेजरकडून १० हजारांची लाच घेणारा रंगेहाथ पकडला !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या मॅनेजरकडून १० हजार रुपयांची लाच घेणारा रंगेहाथ पकडण्यात आला आहे. श्रीरामपूर कार्यालयातील वजनमापे निरीक्षक (वर्ग २) अशोक श्रीपती गायकवाड असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

प्रवरानगर येथे सोमवारी (दि.२९) ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, आरोपीविरुद्ध लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

याबाबत अॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रवरानगर येथे राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था असून, संस्थेमार्फत भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप चालविला जात आहे.

पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅपिंग प्रमाणपत्र देण्यासाठी अशोक गायकवाड याने १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी संस्थेचे मॅनेजर यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली.

दरम्यान, १२ हजार रुपयांच्या लाचेच्या मागणीनंतर १० हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. सदरील १० हजाराची रक्कम संस्थेच्या पंपावर स्वीकारताना अशोक गायकवाड यास रंगेहाथ पकडण्यात आले.

नाशिकचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलिस अधीक्षक प्रविण लोखंडे, रवि निमसे, सचिन सुद्रुक, किशोर लाड, हारुन शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ahmednagarlive24 Office