अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदि यांची जिल्हाधिकारी म्हणून तब्बल अडीच वर्षांची कारकीर्द चांगलीच लक्षवेधी ठरली. या काळात त्यांनी केलेले काम नगरवासीयांच्या चांगलेच स्मरणात राहील.
त्याचबरोबर कोरोना काळात प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करतांनाच आरोग्य कर्मचार्यांमध्ये त्यांनी चेतना जागविली. त्यांच्या संकल्पनेतून शासकीय रुग्णालयात राज्यातील पहिली पीसीआर लॅब अवघ्या 22 दिवसात सुरु केली.यामध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे मार्गदर्शन व महत्वपूर्ण भुमिका होती. त्यांच्या काळात जिल्हा रुग्णालयाचा झालेला कायापालट हा उत्साह वाढविणार आहे. शासनाच्या आदेशानुसार त्यांची बदली झाली असून, मावळत्या जिल्हाधिकार्यांची कारकिर्द स्मरणात राहील.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी राहुल द्विवेदी यांचा यथोचित गौरव करुन निरोप देत आहोत, यापुढील त्यांची सेवा अशीच बहरत राहील, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांनी केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची मुंबई येथे बदली झाल्यानिमित्तजिल्हा रुग्णालयाच्यावतीने त्यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, कॅन्टोंन्मट बोर्डचे सीईओ विद्याधर पवार, कोव्हिड-19 चे जिल्हा समन्वयक डॉ.बापूसाहेब गाढे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दर्शना धोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज घुगे, डॉ.संदिप कोकरे, डॉ.विशाल केवारे, डॉ.कटारिया, डॉ. धनंजय वारे, रुग्णालय प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.भुषणकुमार रामटेके, मुख्य अधिसेविका श्रीमती विद्युलता गायकवाड आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, नगर जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. येथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही, महानगरपालिकेचा मोठा दवाखाना नाही.
जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रयत्नाने कोरोनाचा सामना करता आला. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. या काळात मी कोणाला काही अनावधानाने बोललो असल्यास त्याचा कोणीही राग मनात धरु नये. तो एक कामाचा भाग म्हणून केलेली कृती होती. दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता असल्याने कर्मचार्यांनी न घाबरता अशाच पद्धतीने काम करत रहावे. आतापर्यंत चांगले काम केले आहे, असेच पुढे करत रहा. नागरिकांची सेवा हेच आपले कर्तव्य समजून संवेदनशिलतेने पेशंटची सेवा करत रहा, असा सल्ला दिला.
याप्रसंगी डॉ.बापूसाहेब गाढे म्हणाले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपल्या कारर्किदीमध्ये जिल्हा रुग्णालयासाठी भरीव काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास मदत झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पहिली कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु केली. नोबेल फौंडेशन तसेच धूत फौंडेशनच्या सहकार्याने नवीन आधुनिक आयसीयू विभाग सुरु करण्यात आले. आयसीयू विभागात प्रायव्हेट फिजिशियनच्या सहकार्याने रुग्णांना सेवा दिली. तसेच पाईपलाईनद्वारे नवीन 200 ऑक्सिजन पॉईंट उपलब्ध करण्यात आले.
जिल्हा रुग्णालय परिसरातील अतिक्रमणे काढून सरंक्षक भिंतीसह परिसर सुशोभित करण्यासाठी मदत केली. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात अॅटीजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच शवाहिकेद्वारे मृतदेहाची योग्यप्रकारे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था.
त्याच बरोबर रुग्णांसाठी खाजगी कोव्हिड सेंटर उपलब्ध करुन त्याद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्याने जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळाविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॅब टेक्निशियन माया कोल्हे यांनी केले. तर डॉ.दर्शना धोंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, परिचारिका, परिचर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved