अहमदनगर बातम्या

राहुरी : विजेचा लपंडाव सुरू; शेतकरी वर्ग अडचणीत ! वीज नसल्याने शेतीला पाणी देणे अशक्य

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा सुरू झाला असून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विशेषतः शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून महावितरणचा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने वीज प्रश्नी तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये काही दिवसांपासून सिंगल फेज योजना बंद झाल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

तसेच थ्री फेज वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी हैराण झाले असून गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून वीजेचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे.

थ्री फेज सुरू होत नसेल तर किमान सिंगल फेज तरी सुरू करावी, अशी अपेक्षा असतांना महावितरण कडून वीज पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही.

त्यामुळे महावितरणचा आंधळा कारभार उजेडात आला आहे. वीज वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी शेतातील उभ्या पिकांना पाणी कसे द्यावे या विवंचनेत आहेत.

वीज सुरळीत नसल्याने पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. राहुरी तालुक्यातील बहूतांशी गावांमध्ये सिंगल फेज योजना अनेक दिवसांपासून सुरू करण्यात आली होती.

मात्र काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी सिंगल फेजवर चालणारे विद्युत पंप बसविल्याने पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याचे कारण दाखवत महावितरण विभागाने सिंगल फेज योजना बंद केल्याचे सांगितले जात आहे.

विजेचा लपंडाव सुरू झाल्याने शेती पंप सुरू होत नसल्याने तसेच आता उन्हाळ्याच्या तीव्रतेने शेतकरी अधिक त्रस्त झाले असून वीज नसल्याने शेतीला पाणी देणे अशक्य बनले आहे.

तसेच शेतातील पिकांना वेळेवर पाणी नसल्याने पिके करपू लागली आहेत. दरम्यान विजेच्या प्रश्नाबाबत सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत.

पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शेतातील उभी पिके उष्णतेमुळे जळून जाण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज प्रश्नी आक्रोश आंदोलन हाती घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office