अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : राहुरी – राहुरी स्टेशन रस्त्यावरील खड्ड्याने घेतला युवकाचा बळी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी ते राहुरी स्टेशन हा साधारण ४ किमी अंतराचा रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय बनला असून तांदुळवाडी येथील रामभैय्या ज्ञानदेव धसाळ (वय २२) या युवकाचे नुकतेच नवीन गावठाणजवळ अपघाती निधन झाले आहे.

याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की तांदुळवाडी येथील रामभैय्या धसाळ हा युवक दोन दिवसांपूर्वी राहुरी स्टेशनवरून राहुरीकडे या रस्त्याने जात असताना नवीन गावठाण येथे खड्ड्यामुळे दुचाकीला कट बसला. यामध्ये तो डोक्याला जबर मार बसून गंभीर जखमी झाला होता.

त्याला अहमदनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु त्याचे उपचारा दरम्यान दुर्दैवी निधन झाले. दरम्यान राहुरी ते राहुरी स्टेशन हा रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय बनला आहे. या रस्त्यावर सातत्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या काही महिन्यात सर्वाधिक अपघाताच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. काही ठिकाणी दुकाने, गाळे, मंगल कार्यालय झाल्याने अशा ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Ahmednagarlive24 Office