अहमदनगर बातम्या

Rahuri Railway Station : राहुरी रेल्वे स्टेशनचे स्वरूप बदलणार!

Published by
Ahmednagarlive24 Office

Rahuri Railway Station : राहुरी तालुक्याच्या विकासाचा महत्वाचा घटक असलेले राहुरी रेल्वे स्टेशन विकसित केले जात असून प्रवासी व नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन कात टाकणार असून त्यामुळे पुढील काळात नक्कीच वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

यामध्ये प्रामुख्याने जुनी इमारत उत्तर बाजूने सुमारे ४०० मीटर अंतरावर नवीन बांधकाम सुरू आहे. जुने प्लॅटफॉर्म बदलून नवीन प्लॅटफॉर्म होणार आहेत. त्यामुळे साहजिकच प्रवासी वर्गाला एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यास फूट ओवरब्रीज केला जाणार आहे. लोखंडी पुलाजवळ दुसरा पूल बांधण्यात येत आहे. सदर काम देखील अंतिम टप्प्यात आहे. भुयारी मार्गालगत असलेल्या जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच काँक्रीट रस्ता तयार करण्यात येणार आहे.

जागतिक किर्तीचे तीर्थक्षेत्र शनि शिंगणापूरला जाण्यासाठी होणाऱ्या रेल्वेच्या मार्गाची येथून सुरुवात होणार आहे. त्याचा सव्हें देखील पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. काही महत्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन परिसराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. राहुरी रेल्वे स्टेशन नेहमी अनेक सुविधापासून वंचित राहिले आहे.

सर्व आवश्यक बाबी असतानाही स्टेशन परिसराचा पाहिजे. तेवढा विकास झाला नाही. राहुरी स्टेशन ते शनिशिंगणापूर हे अंतर अवघे २० किमी आहे. तर स्टेशन ते शनिशिंगणापूर फाटा हे अंतर अवघे चार किमी आहे. किमान सदर चार किमी अंतर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास भाविक व प्रवाशांची चांगली सोय होऊ शकते. मुंबई, पुणे यासह मोठ- मोठ्या शहरातून येणारे भाविक शिर्डीला उतरतात.

त्यातील बहुसंख्य भाविक रेल्वेने येतात. त्यांना शिर्डी ते शनिशिंगणापूर हा साधारण ७० ते ८० किमीचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. त्यामुळे नगर- मनमाड व राहुरी-शिंगणापूर या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. प्रमाणापेक्षा जास्त वाहने रस्त्यावर असल्याने प्रसंगी वाहतुकीची कोंडी, अपघात अशा घटना देखील घडतात. भाविकांची सुरक्षा एकप्रकारे धोक्यात आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे शनि शिंगणापूर या तीर्थक्षेत्रा करिता उतरण्यासाठी जवळचे व सोयीचे स्थानक म्हणून पुढे आल्यास हा प्रश्न सुटला जाऊ शकतो.

तसेच महत्त्वाचे म्हणजे दौंड ते मनमाड या रेल्वे मार्गावर बहुतांशी ठिकाणी पिण्याचे गोड व शुध्द पाणी उपलब्ध नाही. राहुरी रेल्वे स्टेशन येथे तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या मदतीने रेल्वे प्रवाशांकरीता पिण्याचे पाणी उपलब्ध करता येईल. या रेल्वे मार्गाने अनेक गाड्या नियमित किंवा आठवड्यातून दोनदा, तीनदा धावत असतात यातील काही महत्वाच्या व सोयीच्या गाड्यांना थांबा मिळाल्यास फक्त पूर्व भागातील परिसरच नाही तर तालुक्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक विकास साध्य होऊ शकतो.

राहुरी रेल्वे स्टेशन हे राहुरी तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून जागतिक किर्तीचे तीर्थक्षेत्र शिर्डी व शनिशिंगणापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. तनपुरे साखर कारखाना, प्रसाद शुगर कारखाना, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शैक्षणिक संस्था, राहुरी महाविद्यालय, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर-मनमाड राज्य महामार्गामुळे या ठिकाणी प्रवासी व नागरीकांची नेहमीच ये-जा सुरू असते. मात्र सध्या बहुतांशी गाड्या बंद असल्याने स्टेशन परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, प्लटफॉर्म, तिकीट आरक्षण सुविधा, प्रतिक्षालय, कचराकुंडी आदी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेस, शिर्डी-मुंबई फास्ट पॅसेंजर, या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाल्यास तसेच पुणे-मनमाड पॅसेंजर, दौंड-मनमाड पॅसेंजर या रेल्वे गाड्या तीन वर्षांपासून बंद आहेत. त्या सुरू होणे गरजेचे आहे. राहुरी स्टेशन येथे एकेकाळी मोठ्या प्रमाणात रिक्षा, टांगे-घोडे प्रवाशी वाहतुकीसाठी सज्ज असायचे. अनेक रिक्षा चालक व हॉटेल व्यावसायिकांना रोजगारही मिळत होता. राहुरी रेल्वे स्टेशन येथे गाड्यांना थांबा मिळाल्यास नक्कीच पुन्हा जुने वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

राहुरी रेल्वे स्टेशन येथे प्रमुख रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला. तर रिक्षाचालक, हॉटेल व्यावसायिक यांना रोजगार मिळेल तसेच महत्वाचे म्हणजे नागरिकांना रेल्वे प्रवास सोयीचा होईल. रेल्वे स्टेशन विकसित झाल्यास नक्कीच सर्व तालुक्यातील नागरिकांना देखील समाधान वाटेल, असे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रभाकर धसाळ यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office