राहुरी पोलीस ठाणे हद्दीत नगर- मनमाड राज्य महामार्गावर कोल्हार खुर्द परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी दि. २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी पोलिस पथकाने छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले, तसेच दोन परप्रांतीय महिलांची सुटका केली.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील हॉटेल न्यू प्रसादजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता.
याबाबत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने दि. २४ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास कोल्हार खुर्द परिसरात सापळा लावला.
त्यावेळी पोलिस पथकाने राहुरी फॅक्टरी येथील एका तरुणाला या ठिकाणी बनावट ग्राहक बनवून पाठवले. तेथे हॉटेलजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम व एक ३१ वर्षीय व एक ३६ वर्षीय अशा दोन पश्चिम बंगाल येथील दोन महिला होत्या.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्या इसमाबरोबर सौदा ठरल्यानंतर बनावट ग्राहक असलेल्या तरुणाने पोलिसांच्या मोबाईलवर मिस्ड कॉल केल्यानंतर पोलीस पथकाने ताबडतोब त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिस पथकाने बगाराम गुमनाराम चौधरी (वय ३९ वर्षे, रा. बुडतला, ता. सिव, जि. बाडमेर, (राजस्थान)) याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे, हवालदार सतिष आवारे, देविदास कोकाटे, चालक जालिंदर साखरे, महिला पोलिस कर्मचारी शालीनी सोळसे यांनी केली. या बाबत हवालदार सोमनाथ जायभाय यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी बगाराम गुमनाराम चौधरी याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ८३९/२०२४ नुसार खिया व मुली अनैतिक व्यापार अधिनियम कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.