अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- देवळाली प्रवरा येथील संदीप कदम या तरूणास व्याजापायी आत्महत्येस प्रवृत्त करणार्या त्या सावकाराच्या देवळाली प्रवरा येथील वस्तीवर पोलिसांनी छापा टाकला.
दरम्यान, दस्तुरखुद शासकीय पंच म्हणून तहसीलदार एफ.आर. शेख हेही या पथकात उपस्थित होते. देवळाली प्रवरा येथील संदीप कदम या तरूणाने दि. 12 जानेवारी रोजी त्या आडते व्यापारी असलेल्या सावकाराच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.
मात्र, त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याला वेळेवर उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती सुधारली. त्याला न्याय मिळण्यासाठी व त्या खासगी सावकारावर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्यात आले.
काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील दीपक नागरगोजे यांनी संबंधित सावकाराच्या घरावर छापा टाकला.
तेथील छाप्यात काही खरेदीखत व रोकड आढळल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी सावकाराच्या वस्तीवर केवळ महिलाच होत्या.
मात्र, तेथे प्रत्यक्षात तो सावकार त्या ठिकाणी फिरकला नाही. तर त्या सावकाराचा भाऊ त्याठिकाणी आला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे खासगी सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.